शांत संयमी व सेवाभावी शिक्षक श्री सोपान पवार सर
सोपान पवार सर म्हटले की एक शांत, संयमी व सतत काम करणारा माणूस डोळ्यासमोर येतो ."आपण भले आणि आपले काम भले" अशा वृत्तीने ते वागत असतात "लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा" या न्यायाने वावरत असतात. विद्यार्थी हे दैवत मानून झटत असतात. आज ते शिक्षकी पेशातील 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा हा परिचय .....
"मऊ मेणा हून आम्ही विष्णुदास l कठीण वज्रास भेदु ऐसे l "असे विष्णुदासांचे सार्थ वर्णन संत तुकारामांनी केलेले आहे., आजचे सत्कार मूर्ती सोपान पवार सर यांना ते तंतोतंत लागू पडते. सोपान पवार सर हे आपल्या या सोनांबे गावातच एका वारकरी, शेतकरी कुटुंबात जन्माला आले .घरची परिस्थिती अतिशय खडतर !तीन भाऊ व दोन बहिणी असा मोठा परिवार !सोपान पवार सर त्यातील शेवटून दुसरे. म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव या संत भावंडांच्या घरातील सोपान देवांसारखेच! त्यांचे वडील बंधू ज्यांना ते सर्वजण दादा म्हणतात. ते मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी एम पवार सर तथा भास्कर महादू पवार ! लहानपणी राहायला घर नव्हते .अगदी चिपटाचे सपार असलेल्या घरात ही भावंडे वाढली. आई वडील काबाड कष्ट करीत असायचे. तरीही सुख काय म्हणतात आणि समृद्धी काय असते ?हे त्यांना ठाऊक नव्हते .अशा कठीण काळात वडील बंधू बी एम पवार यांना लहानपणापासूनच बारागाव पिंपरी येथे मामाच्या घरी रहावे लागले. तिथे त्यांनी पडेल ती कामे केली पण शिक्षण घेतले .नांगरणी, वखरणी अगदी विहिरीवर मोटा त्यांनी हाकल्या मात्र शिक्षणाचा घेतलेला वसा सोडला नाही. हा आदर्श सोपान पवार सरांसमोर होता. वडील भाऊ मामाच्या घरी राहून पडेल ती कामे करून शिकतोय हे पाहून सोपान पवार सर यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला आईबरोबर, वडिलांबरोबर तेही शेतात जाऊ लागले सुट्टीच्या दिवशी इतरांच्या शेतात मोलमजरी करू लागले पण कोपटातील ज्ञानाचा दिवा आणि अंतरातला शिक्षणाचा वणवा त्यांनी विझू दिला नाही .बेंदवाडी वस्तीतून सोनांबे गावात ते प्राथमिक शिक्षणासाठी पायी येत.पायात साधी चप्पलही नसायची.त्यानंतर याच विद्यालयात दहावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले .मला काहीतरी करायचेय .शिक्षणच मला या परिस्थितीतून माझा उद्धार करेल असा त्यांचा ठाम विश्वास असल्याने ते अभ्यास करीत राहिले वडील बंधू बी एम पवार सर आठवीला असताना बीए बीएड होऊन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत इंग्रजी शिक्षक म्हणून रुजू झाले हा क्षण पवार कुटुंबीयांसाठी ऐतिहासिक होता. कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र सरकारी नोकरीत लागल्याने कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नव्हता .साहजिकच ज्येष्ठ बंधू बी एम पवार सर यांनी या पुढची कुटुंबाची जबाबदारी हाती घेतली. आई बापाच्या फाटक्या संसाराला हातभार लावला कुटुंबासाठी प्रथमच कौलारू घर बांधले, शेतीची सुधारणा केली, सिंचनाची व्यवस्था केली .दरम्यानच्या गरीबीच्या परिस्थितीमुळे मधले बंधू संपत राव यांचे शिक्षण अर्धवट राहिले शिक्षण मध्येच सोडून त्यांनी वडिलांच्या हाताखाली सर्जा राजाला बरोबर घेत शेती करायला सुरुवात केली सोपान पवार सरांना आता ज्येष्ठ बंधू सह सर्वांचाच भक्कम आधार प्राप्त झाला होता.योगायोग म्हणजे बी एम पवार सर सोनांबे विद्यालयात बदलून आले.जसे निवृत्ती दादा ज्ञानदेव व सोपनाचे गुरु झाले तसेच बी एम पवार सर सोपान सरांना आठवीला इंग्रजी शिकवायला होते.त्यामुळे मोठे बंधू शिक्षक झाले तसेच आपणही शिक्षक व्हावे अशी भावना सोपान सरांच्या मनात जागृत झाली. ज्येष्ठ बंधू बी. एम. पवार सर यांनीही वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केले "दहावीला चांगले गुण मिळाले तर तुझा डी एड ला नंबर लागेल व तू लगेच माझ्यासारखा शिक्षक होशील !मात्र त्यासाठी तुला चांगला अभ्यास करावा लागेल "असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला होता. आता ध्येय ठरले होते आणि यशही दृष्टी पथात होते मात्र रस्ता खडतर होता. कारण त्याकाळी ग्रामीण भागातून दहावी पास होणेच अवघड मानले जायचे त्यातच चांगले गुण मिळवणे म्हणजे मोठे दिव्यच होते. सोनांबे पंचक्रोशीतच नव्हे तर सिन्नर तालुक्यात डीएड काय असते त्याला प्रवेश कसा मिळवायचा हे अनेकांना ठाऊक नव्हते मात्र बी एम पवार सरांमुळे प्रथमच डीएड विषयी सर्व माहिती सोपान पवार सरांना मिळाली. सरांनीही मग दहावीला दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून कसून अभ्यास केला यथावकाश दहावीचा निकाल लागला सरांना 67 टक्के गुण मिळाले ते शाळेत तिसरे आले पण चांगले गुण मिळाल्याने त्यांचा मविप्र संस्थेचे महाराष्ट्रातील नावाजलेले महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय नाशिक या डीएड कॉलेजला नंबर लागला .राहायचा प्रश्न होता मात्र कॉलेजचे वसतिगृह होते डीएड दोन वर्षाचे होते दोन्ही वर्ष सर वस्तीगृहात राहिले पहिल्या वर्षी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी चालवलेली मेस होती त्यामुळे खाण्याचा प्रश्न सुटला होता मात्र दुसऱ्या वर्षी काही कारणांनी मेस बंद पडली त्यामुळे सरांना खानावळ लावावी लागली त्यामुळे थोडा खर्च वाढला. अशावेळी थोडाफार खर्च निघावा म्हणून वडील बंधूंच्या ओळखीच्या शिंदे भाऊसाहेब नावाच्या एका सदृगृ हस्थाने त्यांना स्वतःची सायकल दिली व सायंकाळी त्यांच्या मुलांना घरी येऊन शिकवायचे काम दिले सकाळी कॉलेज करून सायंकाळी पवार सर सायकल वर बसून उदोजी मराठा वस्तीगृह परिसरात जात तेथे मुलांची तास-दोन तास शिकवणी करून पुन्हा डीएड कॉलेजच्या वस्तीगृहात येत "शिकता शिकता शिकवणे व कमावणे" हा ज्येष्ठ बंधूंनी दिलेला व यशस्वीपणे राबवलेला मंत्र सरांना कामी आला. त्या काळात डी एड चा सर्वत्र बोलबाला होता गुणवत्तेत आलेली सर्व गुणवान मुलेच डीएडला जात होती परिस्थितीने गरीब मात्र ज्ञानाने श्रीमंत असलेली ही मुले शिक्षक होण्याची स्वप्ने घेऊन डीएडला येत डीएड झाल्यावर त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आश्रम शाळा, मनपा शाळा या ठिकाणी निवड मंडळाच्या माध्यमातून हमखास नोकरी मिळायची. ज्यांचा तिकडे नंबर लागला नाही अशी मंडळी खाजगी संस्थाकडे वळायची. अशा स्पर्धेच्या काळात सर्वांचा ओढा जिल्हा परिषदेकडे असायचा. खाजगी शिक्षण संस्थांकडे गुणवान विद्यार्थी वळावेत,हुशार विद्यार्थी संस्थेला शिक्षक म्हणून लाभावेत या विचारातून तत्कालीन सरचिटणीस कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांनी डीएडला पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला व दरवर्षी संस्थेतील डी एड मध्ये पहिल्या पाच मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना ते संस्थेत शिक्षक म्हणून संधी देऊ लागले आज आपण ज्याला कॅम्पस सिलेक्शन म्हणतो त्याची सुरुवात मराठा विद्या प्रसारक संस्थेने अशा प्रकारे त्या काळात केली होती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत शिक्षकाची नोकरी मिळणे म्हणजे मोठे प्रतिष्ठेचे व भाग्याचे लक्षण आजही मानले जाते त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये खूपच स्पर्धा असायची जो तो पहिल्या पाच क्रमांका मध्ये येण्यासाठी धडपड करायचा .सोपान पवार सर ही त्याला अपवाद नव्हते त्यांनीही प्रयत्न केला लवकरच कोर्स संपला परीक्षेचा निकाल लागला आणि सोपान पवार सर डीएडला दुसरे आले संस्थेच्या निर्णयामुळे व उदार धोरणामुळे त्यांना लागलीच संस्थेत शिक्षकाची नेमणूक मिळाली सोपान पवार सर आपल्याच तालुक्यात नूतन जवाहर विद्यालय मनेगाव या शाळे त रुजू झाले विशेष म्हणजे वडील बंधू बी एम पवार सर ही याच विद्यालयात प्रथम रुजू झाले होते.ज्या कुटुंबात चिपाटाचे सपार होते शिक्षणाचा गंध नव्हता त्याच कुटुंबात बी एम पवार सर त्यांच्या पत्नी सौ चंद्रकला ,मुलगी अर्चना तसेच सोपान पवार सर, त्यांच्या पत्नी सौ इंदू हे पाच शिक्षक झाले आज घडीला त्यांनी हजारो विद्यार्थी घडवले आहेत "ज्योतसे ज्योत जगाते चलो ज्ञान की गंगा बहाते चलो " असे काम त्यांनी उभे केले आहे ही खरोखरच आपल्या पंचक्रोशीच्या दृष्टीने भूषणावह गोष्ट आहे.
या पवार कुटुंबाची पुढची पिढी ही शिक्षणाचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहे बी एम पवार सरांचा मुलगा वैभव ,स्नुषा सुखदा प्रथित यश डॉक्टर आहेत. नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात नाव कमावत आहेत. सोपान पवार सर व बी एम पवार सर या दोघा भावांनी इंग्रजी शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला. ए फॉर अँपल ,बी फॉर बॉल ही साहेबांची इंग्रजी भाषा विद्यार्थ्यांना शिकवली मात्र सोपान पवार सरांचा मुलगा ओमकार याने तर साहेबांची इंग्रजी नुसती शिकली नाही तर थेट साहेबांची मूळभूमी लंडन गाठली. तिथे तो मास्टर ऑफ मास मीडियाचे शिक्षण घेत आहे तसेच नोकरीही करीत आहे. थोरला मुलगा सारंग हा आयटी इंजिनियर म्हणून मुंबई येथे आयटी कंपनीत काम करीत आहे .संपत रावांचा मुलगा नितीन पोल्ट्री व शेती सांभाळत आहे तर समाधान डिप्लोमा करून सिन्नरलाच नोकरी करीत आहे.
सोपान पवार सर ज्यांना आम्ही प्रेमाने ' अण्णा ' म्हणतो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी वेगळा पैलू म्हणजे श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग चे ते सक्रिय साधक आहेत. जीवनात ध्यानधारणा ,योग यांचे असलेले महत्त्व ते इतरांना सांगतात. स्वतः अंगीकारतात व शिकवतात सुद्धा! 2006 पासून अण्णा दहावीच्या वर्गाला इंग्रजी शिकवत आहेत.बोर्डाचे दहावीचे इंग्रजीचे परीक्षक म्हणून आज गायात काम करत आहेत .विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्काऊट गाईड चळवळ ,राष्ट्रीय हरित सेना यातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे .तुकडोजी महाराज म्हणायचे एक तरी अंगी असू दे कला l नाहीतर काय फुका जन्मला l अण्णांचा एमएपर्यंतचा व अध्यापनाचा विषय स्पेशल इंग्रजी असला तरी ते गणित विज्ञान, हिंदी, खेळ तितक्याच ताकदीने शिकवू शकतात. डीएसएम हा मुक्त विद्यापीठाचा कोर्सही अण्णांनी केलेला आहे. अशी सर्व क्षेत्रात मुशाफिरी करणारे, विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक सोपान महादू पवार सर सेवानिवृत्त होत आहे कायम शाळेचा, संस्थेचा व विद्यार्थ्यांचा विचार करणारा हा माणूस! मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ही माझी दुसरीआई आहे असे मानणारे, सेवाव्रती शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने त्यांची उणीव जाणवणार आहे. मात्र ज्या शाळेत ते शिकले त्याच शाळेत, ज्या गावात ते वाढले त्याच गावात ते आपल्या सेवेची सांगता करत आहे यासारखे दुसरे भाग्य कोणते?
सोपान पवार सर व त्यांचे सर्व कुटुंब हे वारकरी आहेत जशी त्यांची पांडुरंगावर श्रद्धा आहे तसेच ग्रामदैवत भैरवनाथ व आई भवानी माता यांच्यावर सुद्धा आहे. आई-वडिलांनी बालवयात दिलेले भक्तीचे व संस्काराचे धडे आजही कायम आहेत. सर ,आजही एकादशी व्रत निष्ठेने करतात. खरे तर या सर्व भावंडांचा हा यशस्वी प्रवास पाहण्यासाठी वडील कै. महादू वाळू पवार असायला हवे होते मात्र नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. समाधानाची गोष्ट म्हणजे मातोश्री अनुसयाबाईंचे मातृछत्र आजही कायम आहे .बहिणी सौ चंद्रभागा भाऊसाहेब कोकाटे, सौ राधाबाई तानाजी शिंदे या त्यांच्या संसारात सुखी आहेत .सरांच्या प्रवासात घरच्या मंडळींबरोबरच पत्नी सौ .इंदुताईंची भक्कम साथ मोलाची आहे .आम्ही बघितले आहे. कितीही लवकर शाळा असली तरी सोपान पवार सरांचा जेवणाचा डब्बा नाही असे कधी झाले नाही. सोपान पवार सरांनी एसएससी डीएड म्हणून सेवेला सुरुवात केली आज ते एम ए इंग्लिश बीएड म्हणून सेवानिवृत्त होत आहे त्यांचा स्वभाव म्हणजे शांती ब्रह्मच!
माळीये जेऊते नेले तेउते निवांत ची गेले l तया पाणी या ऐसे हो आवे गा ll
या माऊलींच्या ऊक्ती प्रमाणे त्यांचा जीवनप्रवास चालू आहे .सरांनी आजपर्यंत नूतन जवाहर विद्यालय मनेगाव,आरूढ विद्यालय म्हाळसाकोरे, वाजे विद्यालय सिन्नर, न्यू इंग्लिश स्कूल दिंडोरी ,जनता विद्यालय पांढुर्ली ,मराठा हायस्कूल नाशिक, के बी एच विद्यालय गिरणारे आणि आता जनता विद्यालय सोनांबे या ठिकाणी सेवा केली आहे एकूण 39 वर्ष सेवा करून ते सेवानिवृत्त होत आहे त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे व आरोग्यमय जावो हीच शुभेच्छा !
किंबहुना तुमचे केले l हे धर्मकीर्तन सिद्धीस गेले l तेथे माझे जी उरले पाईकपण ll
अशा सरांच्या भावना आहेत .सरांना सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा !!!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा