वाचनाचे महत्व

मित्रांनो वाचाल तर वाचाल असे आपण म्हणतो.वाचनाने जीवन समृद्ध होते.वाचन हे ज्ञान मिळवण्याचे साधन आहे.जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा त्या लेखकाच्या विचारांशी आपण तादात्म्य पावतो.त्यांच्या विचारांशी आपण समरस होत असतो.आज महान लोक नसले तरी त्यांचे ग्रंथ आहेत,पुस्तके आहेत.ग्रंथ व पुस्तकांच्या रुपाने हे महान नेते आजही जिवंत आहेत.जेव्हा आपण सत्याचे प्रयोग पुस्तक वाचतो तेव्हा महात्मा गांधी आपल्याला भेटतात.त्यांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून जे विविध प्रयोग केले ते सर्व प्रयोग आपल्याला कळतात.आजही म.गांधींचे सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचून अनेकांनी आपले जीवन लोकांसाठी अर्पण केले आहे.साने गुरूजींचे श्यामची आई पुस्तक वाचून कोवळ्या वयातील कोणत्याही मुलाला मातृप्रेमाची महती नव्याने कळते.आई माझा गुरू /आई कल्पतरू/ सौख्याचा सागरू / आई माझी.असे जे साने गुरूजी म्हणतात ते आपल्याला पानापानावर पटायला लागते.आई मुलांना घडवते. आई म्हणजे मुलाचे पहिले विद्यापीठ.अशी आईची महती नव्याने आपल्याला हे पुस्तक वाचून समजते.मानवी संस्कृतीचा इतिहास,माणसाने आपले जिवन उन्नत करण्यासाठी केलेले प्रयत्न, आपल्याला या पुस्तकांच्या माध्यमातून समजतात .आज इंटरनेटचे युग आहे.गुगलच्या माध्यमातून हवी ती माहिती एका क्षणात मिळते.यु ट्युब व दूरदर्शनद्वारेही माहिती मिळते.या तंत्रज्ञानाने ज्ञानाचा स्फोट झाला आहे.जग जवळ आले आहे.विविध भाषांमधील,देशांमधील विचारांचे आदान प्रदान होऊ लागले आहे.असे असताना पुस्तकांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे.ग्रंथालयात जा,आपल्याला हवा तो संदर्भ ग्रंथ शोधून काढा,मग तो वाचा व त्यानंतर हवी ती माहिती शोधून काढा.अशी अत्यंत वेळखाऊ व कंटाळवाणी प्रक्रिया म्हणजे वाचन. अशी आज धारणा झाली आहे.आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जिवनात प्रत्येकाकडे खूप कमी वेळ असतो अशावेळी साधे वर्तमानपत्रही कुणी वाचायची तसदी घेत नाही.मात्र ही झाली शहरातील परिस्थिती.परंतु ग्रामीण भागात जिथे विज,पाणी,रस्ते या मूलभूत सुविधांची वाणवा असते तिथे इंटरनेट सुविधा पुरविणे मोठे आव्हान आहे,अशावेळी गुगल,ई पुस्तके कोण वाचणार?इंटरनेटची अखंडीत सेवा असली आणि त्यातही इंटरनेटचे दर परवडणारे असतील तरच सामान्य माणूस आंतरजालातील माहिती घेऊ शकतो.मात्र आजतरी अशी परिस्थिती नाही.असलीच कुणाकडे इंटरनेटची सुविधा तर तो फेसबुक, चॅटिंग, व्हाट्सअप यांच्याच गुंत्यात अडकून पडतो. त्यातच त्यांचा वेळ जातो . मात्र पुस्तकांचे तसे नाही. अगदी खेड्यात गुरे चारणारा गुराखी मुलगाही ऐटीत म्हशीवर बसून वाचण्याचा आनंद घेऊ शकतो. कधी झाडावर बसून, तर कधी घरात ,कोठेही ,कोणत्याही वेळेस ,पुस्तके वाचता येतात. पुस्तक व आपण जेव्हा एकरूप होतो तेव्हा जगाच्या अस्तित्वाची जाणीवही राहत नाही. आजही कर्णाच्या जीवनावरील मृत्युंजय, पानिपत, छावा, युगपुरुष आदी जाडजूड कादंबऱ्या एकाच बैठकीत वाचणारे लाखो लोक आहेत. वाचायला वेळ मिळाला नाही तर किमान एखादी ओवी तरी वाचनारे लोक आहेत."नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी/ एक तरी ओवी अनुभवावी"या न्यायाने ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा,श्रीगुरुचरित्र,नवनाथ भक्तीसार आदी ग्रंथांचे पारायण करणारे लोक आहेत.ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी व तुकारामांची अभंगवाणी आमच्या जनमानसात इतकी रुजली आहे की दैनंदिन जीवनात,तसेच सर्व क्षेत्रात  आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. जीवन  समृद्ध करणारे दासबोध, ज्ञानेश्वरी,एकनाथी भागवत ,तुकाराम गाथा या धार्मिक ग्रंथाबरोबरच साने गुरुजींची "श्यामची आई"आचार्य अत्रेंचे "कर्हेचे पाणी",महात्मा गांधींचे "माझे सत्याचे प्रयोग",यशवंतराव चव्हाणांचे "कृष्णाकाठ",वि. दा.सावरकरांचे "माझी जन्मठेप",महात्मा फुलेंचे"सार्वजनिक सत्यधर्म",हिटलरचे "माईन काम्फ"इ.पुस्तके वाचून आपण आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो. मात्र काय वाचावे?हे फारच महत्वाचे आहे.जीवन घडवणारी पुस्तके आहेत तशी जीवन बिघडवणारी पुस्तकेसुद्धा आहेत.यासाठी आपले शिक्षक,आई वडील,घरातील मोठी माणसे यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुस्तके वाचली पाहिजेत.वाढदिवस दणक्यात साजरा करण्याऐवजी वाढदिवसाला छान छान पुस्तके वाटली पाहिजेत.दिवाळीला फटाके वाजवण्याऐवजी दिवाळी अंक विकत घेऊन वाचले पाहिजेत.गाव तेथे ग्रंथालय ही लोकचळवळ झाली पाहिजे.आपण स्वतः पुस्तक वाचले पाहिजे व इतरांनाही वाचण्यास प्रोत्साहित केले पाहिजे तरच वाचनसंस्कृती जपता येईल! -दीपक भालेराव सोनारीकर

टिप्पण्या