मित्रांनो,परीक्षा हा आपल्या विद्यार्थीदशेतील महत्त्वाचा भाग झाला आहे.परीक्षा म्हटले की लवकर उठायचे,वेळेवर जायचे. एवढेच कशाला?परीक्षेच्या काळात देवळात जाणारे,देवाला नमस्कार करणारे,आईबाबांच्या पाय पडणारे यांची संख्या अचानक वाढते.घरातील कामाचा बोजा कमी होतो.आई,बहीण,भाऊ सारे अरे त्याची परीक्षा आहे बरं का?त्याला आता काम सांगू नका, अभ्यास करू द्या अशी सहानुभूती दाखवत असतात.अशावेळी पाठांतर करणे,पहाटे लवकर उठणे,IMP म्हणजे महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पहाणे हे सर्व प्रकार होतात.शालेय जीवनात आपल्याला अनेक परीक्षा द्याव्या लागतात.घटक चाचणी,सहामाही,वार्षिक आदी परीक्षा द्याव्या लागतात.या सर्व परीक्षा देताना आपण कधी विचार करतो का?कि या परीक्षा कशासाठी?तर याचं साधसुधं उत्तर देता येईल. शितावरून भाताची परीक्षा या म्हणीद्वारे.मोठ्या पातेल्यात भात शिजला आहे की नाही?हे जाणून घेण्यासाठी आई पातेल्यातून एखादे शीत काढते आणि दोन बोटांमध्ये दाबून ठरवते कि भात कच्चा आहे की शिजला आहे?पूर्वी संतचरित्रात नाही का? संत मुक्ताबाईंनी गोरोबाकाकांचे थापटने घेऊन सर्व संतमंडळींच्या डोक्यात मारले व सांगितले की काका हा नाम्या म्हणजे कच्चं मडकं आहे.यानिमित्ताने मुक्ताईने संतमंडळींच्या संतत्वाची परीक्षाच घेतली होती.संत ज्ञानेश्वरांनी याबाबत फारच सुंदर दृष्टांत दिला आहे.माउली म्हणतात ,एखाद्या मोठ्या भांड्यात पाणी साठवायचे असेल तर चतुर मनुष्य प्रथम त्या भांड्यात थोडेसे पाणी टाकतो.थोडावेळ ते भांडे गळते आहे की नाही हे पाहून मगच ते भांडे भरतो किंवा एखादा श्रीमंत माणूस नोकराला कामावर ठेवतो व मुद्दामच एखादी मौल्यवान वस्तू उघड्यावर टाकतो जेणेकरून ती वस्तू नोकराला सापडावी.अशावेळी सापडलेली वस्तू नोकराने प्रामाणिकपणे परत केली तर मालक त्याला भांडारी म्हणून नेमतो.गुरुशिष्यांच्या अशा खूप गोष्टी पुराणात आहेत.त्या सर्व गोष्टींचा धांडोळा आपल्याला घेता येणार नाही .पण परीक्षा घेतल्याशिवाय त्या वस्तूची किंमत कळत नाही हे मात्र खरे!शाळा हे विद्यार्थी घडविणारे मंदिर आहे.शाळा,अभ्यासक्रम,शिक्षक,शैक्षणिक साधने ,एकूणच सर्व शिक्षणव्यवस्था विद्यार्थी घडावा,तो चांगला नागरिक बनवा म्हणून काम करीत असतात.अशावेळी आपण शिकवलेले विद्यार्थ्याला किती समजले ?पाठ्यपुस्तकातील आशय विद्यार्थ्याला किती समजला?त्याने गणित,इंग्रजी,इतिहास,भूगोल या विषयातील किती क्षमता प्राप्त केल्या आहेत ?त्याचे हस्ताक्षर,शुद्धलेखन,अभिव्यक्ती कशी आहे?तो कुठे कमी पडतो आहे?कोणत्या संकल्पना त्याला नीट समजलेल्या नाहीत?कोणता विषय त्याला सोपा वाटतोय? कोणता विषय त्याला अवघड वाटतोय? हे सारे शिक्षकांना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागते.त्यातून जे निष्कर्ष बाहेर येतात त्यातून शिक्षक आपली अध्यापनाची दिशा ठरवतात.पूरक अध्यापन पद्धती वापरतात.वैयक्तिक मार्गदर्शन,स्वाध्याय,गृहपाठांची योजना करतात.याशिवाय परीक्षा दिल्यानंतर पेपर तपासून होतात त्या गुणदानावरून आपल्याला आपली स्वतःची प्रगती समजते.आपण कोणत्या टप्प्यावर आहोत?आपल्याला कोणता भाग अवघड जातो?आपण कुठे कमी पडतो?हे समजते.त्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो.विशिष्ट विषयांच्या तयारीसाठी अधिक वेळ देणे,पूरक मार्गदर्शन घेणे अशा गोष्टी करू शकतो.म्हणजेच या सर्व घटकांचा पाया परीक्षा आहे.परिक्षेमुळे एक दिशा मिळते.परीक्षेतील निष्कर्ष पुढील परिणाम ठरवतात.म्हणूनच परीक्षा गंभीरपणे दिली पाहिजे.मला जे येते तेच मी लिहिल.कोणाशी बोलणे,कुणाचे पाहणे,वेळेआधी पेपर देणे,आपले उत्तर इतरांना दाखवणे,वर्गात गोंधळ करणे,कॉपी करणे हे परीक्षेतील गैरप्रकार आहेत.ते आपण टाळले पाहिजे.परीक्षा या मुक्त वातावरणात झाल्या पाहिजे.प्रामाणिकपणे आपण आपला पेपर लिहिला पाहिजे.पण असे होताना खरेच दिसते का?या परिक्षेतूनच माणसे मोठी होतात.डॉक्टर,इंजिनिअर,वकील होतात.एवढेच नाहीतर M.P.S.C.,U.P.S.C.च्या माध्यमातून तहसीलदार,जिल्हाधिकारी होऊन लाल दिव्याच्या गाडीत फिरतात.म्हणजे परीक्षा हेच त्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे,प्रवेशद्वार आहे.लेखी परीक्षेसाठी अभ्यास जितका महत्त्वाचा आहे तितके उत्तरपुस्तिका लिहिण्याचे तंत्रही महत्त्वाचे आहे.पेपर लिहितांना तो सुवाच्च,सुंदर हस्ताक्षरात लिहावा,पेपरला पुरेसा समास सोडावा,नविन पानावर नवीन प्रश्न लिहावा,पेन्सिलचा वापर करून योग्य तेथे पेपर सजवावा,म्हणजे रिकाम्या जागा भरतांना,जोड्या लावतांना अधोरेखित करावे.प्रश्नाचे उत्तर संपल्यावर एक रेषा सोडावी,मगच पुढचा प्रश्न व उत्तर लिहावे.पेपर लिहिण्यापूर्वी प्रश्नपत्रिका काळ्जीपूर्वक वाचावी,सोपे प्रश्न सुरवातीला सोडवावे मग अवघड प्रश्न सोडवावे.पेपर लिहून झाल्यावर तो सम्पूर्ण तपासावा.काही लिहायचे राहिले नसल्याची खात्री करावी,प्रश्नक्रमांक अचूक टाकावेत.या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत.परिक्षेच्याकाळात उगाच जागरण करू नये,खाण्यापिण्याचे बंधन पाळावे,आरोग्याची,शरीराची काळजी घ्यावी.असे खूप काही सांगता येईल आज इतकेच.यापुढेतुम्हाला खूप परीक्षा द्यायच्या आहेत.जीवन हीसुद्धा एक परिक्षा आहे.येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये तुम्ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे यासाठी तुम्हाला शुभेच्छा!
उत्कृष्ट लेखन आणि आमच्या सारख्या तरुण पिढीला खूप उपयोगी...I really like your point of view towards exam and preparation for students...Also got to know about ancient stories behind exams...👍👍👍
उत्तर द्याहटवा