महाराष्ट्र राज्यात इ.५वी ते १०वी चे वर्ग असणाऱ्या माध्यमिक शाळा आहेत.या शाळांमध्ये कलाशिक्षक,क्रीडाशिक्षक,बी.एड.व डि. एड.शिक्षक काम करतात.पदवीधर डि एड शिक्षक इ ५ वी ते इ८वी साठी तर पदवीधर बी एड शिक्षक इ.९वी,१०वी साठी अध्यापन करतात.त्यामुळे त्यांच्या वेतनश्रेणीतही फरक आहे.वरच्या वर्गांना शिकवणाऱ्या बी एड पदविधारकांना साहजिकच अधिक वेतन आहे.परंतु काही बी एड शिक्षक ५वी ते ८वी ला शिकवूनही अधिक वेतन घेतात.म्हणजेच ५वी ते ७वी ला पदवीधर डी एड शिक्षकाने शिकवले तर कमी वेतन. तेच बी एड शिक्षकाने शिकवलं तर जास्त वेतनश्रेणी मिळते.काम एकच असतांना वेतनातील फरक का?समान काम समान वेतन हे तत्त्व येथे का पाळले जात नाही? एवढे कमी म्हणून कि काय याच बी एड शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पर्यवेक्षक ,मुख्याध्यापक म्हणून बढती मिळते.साहजिकच शाळेतील बी एड,बी पी एड, ए एम शिक्षकांना वरचे पद मिळून प्रशासन सांभाळण्याची तसेच उच्च वेतनश्रेणीची संधी मिळते.मात्र त्यांच्या बरोबरीने वर्षानुवर्षे काम करणाऱ्या बी ए डि एड,बी एस सी डि एड शिक्षकाला हि संधी कधीच मिळत नाही.काम तेच मात्र वेतन कमी !तसेच पदोन्नतीही नाही ...अशी या डि एड शिक्षकांची अवस्था असते.त्यांना कधी सेवाज्येष्ठ मानले जात नाही .ज्यादा तासिका देतांना, वर्गशिक्षकाचे काम देतांना ,तो केवळ डी एड आहे म्हणून त्याच्यावर कायमच कामाचा बोजा टाकला जातो.सेवाज्येष्ठ शिक्षकाला वयाचा विचार करून जादा तासिका,वर्गशिक्षकपद यातून कधीकधी सूट दिली जाते अशावेळी वयाने व सेवेने अधिक असूनही डि एड शिक्षकाला हि सवलत मिळत नाही. तुलनेने त्याच्यापेक्षा वयाने व सेवेने कमी असणाऱ्या बी एड शिक्षकाला या सवलती मात्र मिळतात.अशाप्रकारे डी एड शिक्षकाला कायमच दुय्यम भूमिका निभवावी लागते.
खरेतर बढती मिळणे हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा नैसर्गिक हक्क आहे .मात्र माध्यमिक शाळांमधील बी. ए. डि एड ,,बी .एस. सी. डि एड शिक्षक या पासून वंचितच राहतो.त्यांनी बी.ए.अथवा बी.एस.सी.पदवी मिळवली आहे .शिक्षण शास्त्रातील डी.एड पदविका पण मिळवली आहे.तरीही तो केवळ डी.एड असल्याने उपेक्षित राहतो.माध्यमिक शिक्षकांच्या संघटना,पतपेढ्या,एवढेच नव्हे तर शिक्षक आमदार व तत्सम लाभाच्या व शोभेच्या पदांवरसुद्धा संख्येच्या प्रमाणात डीएड शिक्षकांना स्थान मिळत नाही.सेवानिवृत्तीपर्यंत ते सेवाज्येष्ठ होत नाही. निवृत्तीपर्यंत त्यांना वर्गशिक्षकाची व तत्सम कामे करावीच लागतात. शालेय प्रशासनात बी एड शिक्षकांचा वरचष्मा असल्याने बी एड पदविधारकांना झुकते माप दिले जाते.हजेरी पत्रकावर काल परवा आलेला बी एड शिक्षक सिनियर म्हणून अगोदर असतो त्यानंतर डी एड शिक्षक असतो.शिक्षक दिन ,गुरू पौर्णिमा आदी कार्यक्रम प्रसंगी अगोदर बी एड शिक्षकांचा सत्कार करण्यात येतो त्या नंतर डी एड शिक्षकांचा होतो.
माध्यमिक स्तरावर डी एड शिक्षक सेवानिवृत्ती पर्यंत केवळ उपशिक्षकच असतो. याउलट जिल्हा परिषद शाळांमध्ये डीएड शिक्षकांना मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक,केंद्रप्रमुख अशा पदांवर बढती दिली जाते.जी गोष्ट जि .प मध्ये होते ती माध्यमिक शाळांमध्ये का होत नाही? डि एड शिक्षकांना माध्यमिक स्तरावर योग्य न्याय मिळत नसेल तर त्यांनी या ठिकाणी काम स्वीकारून मोठी घोडचूक केली आहे का?वास्तविक पहाता डी.एड ला अशाच लोकांना प्रवेश मिळतो जे १० वी १२ वी ला गुणवत्ता यादीत होते.तरीही त्यांना डावलले जात आहे!
यावर खरेतर सार्वजनिक विचारमंथन होऊन या उपेक्षित घटकांना न्याय मिळवून दिला पाहिजे.याबाबत मा.न्यायालयाने डीएड पदविकाधारकांना दिलासा दिला होता मात्र त्यावरही बी एड पदविधारकांनी न्यायालयातुनच स्थगिती आणून डीएड पदविकाधारकांचा बढतीचा मार्ग कायमचा बंद केला आहे. या बाबत राज्य सरकारने पुढाकार घेऊन माध्यमिक शाळा संहितेत योग्य ती सुधारणा करून या नाही रे वर्गाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा