वृक्ष माझे मित्र (प्राथमिक शाळेतील मुलांसाठी भाषण)

कार्यक्रमाचे अध्यक्ष,परीक्षक,निरीक्षक आणि माझ्या स्पर्धक मित्र मैत्रिणींनो.आम्ही वडांगळी गावात राहतो .मी आईला विचारले ,आई आपल्या गावाला वडांगळी का म्हणतात ?आई म्हणाली ,फार पूर्वी या गावात वडाची खूप झाडे होती .वडाच्या झाडांमुळे नाव पडले वडांगळी .मी कधी कधी आजोबांबरोबर शेतात जातो .आजोबा मला शेतातील झाडे दाखवतात. या झाडांनाच वृक्ष म्हणतात .असे आजोबांनी मला सांगितले .झाडांची नावे सांग म्हटले ,की वड, पिंपळ, लिंब ,चिंच ,आंबा हि नावे मी पटकन सांगतो .कारण ही सगळी झाडे मी पहिली आहेत.नागपंचमीला सकाळी सकाळी या झाडांना आम्ही झोका बांधतो .दिदीबरोबर दिवसभर झोका खेळतो. सुट्या असल्या कि वडाच्या परंब्यांना आम्ही लटकतो .खूप मजा येते .एका सणाला तर आई वडाची पूजा करते. वडाला दोरा गुंडाळते .आई तू असे का करते ?असं आईला विचारलं ,तर ती म्हणते हि पूजा केल्याने पप्पांच आयुष्य वाढत .मला खूप गम्मत वाटली .गुढीपाडवा एक सण असतो .त्या दिवशी कडुलिंबाची पाने खातात. पाने कडू लागतात .मात्र त्यामुळे आपण आजारी पडत नाही .असे आज्जी सांगते .मला झाडे खूप आवडतात आम्ही उन्हाळ्यात झाडाखाली झोपतो .आमच्या बैलांना ,गाईंना झाडाखाली बांधतो. आंबे ,चिंचा, बोरे खातो .झाडे आपल्याला सावली देतात.खायला फळे देतात. आजार बरा करतात .त्यामुळे झाडांना मी देवच मानतो .पण देव तर लगेच दिसत नाही .मग बरोबर असतो तो मित्र .म्हणून नेहमी उपयोगी पडणारा वृक्ष मला मित्र वाटतो .पण माणसे हि झाडे तोडतात ,तेंव्हा मला खूप वाईट वाटते.हिरवी हिरवी झाडे ,डोलणारी झाडे ,अशी जमिनीवर पडलेली दिसतात.करवतींने त्यांना कापतात.कुऱ्हाडीने तोडतात.बिचाऱ्या झाडांना माणसे असे का करतात?पप्पा सांगतात,या झाडांपासून लाकूड मिळते.मग आपण घरातील टेबल,खुर्ची,दरवाजे,कपाट बनवतो.काही लोक लाकडे जाळतात. चुलीवर स्वयंपाक करतात.लाकडापासून नांगर,वखर बनवतात.बैलगाडी बनवतात. शेतकऱ्याला या वस्तू खूप कामाला येतात.देवपूजेला चंदन,गळ्यात तुळशीची माळ,चुलीत सरपण,घरात फर्निचर,आणि शेवटी माणूस मेल्यावर म्हणे त्याला लाकडात जाळतात.एवढी सारी झाडाची सोबत पाहिल्यावर खरच झाड म्हणजे वृक्ष.माझा म्हणजे आपल्या सर्वांचा मित्र आहे असे मला वाटते.मी देवाला प्रार्थना करतो                       .देवबाप्पा देवबाप्पा,    झाडांची नि माझी मैत्री   अशीच राहू दे।      झाडाबरोबर मला              खूप मोठे होऊ दे ।झाडांसारखेच दुसऱ्याच्या उपयोगी पडू दे ।              एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.जयहिंद!जय महाराष्ट्र!

टिप्पण्या