श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान, सोनांबे ! मंदिरात उतरते सर्पदंशाचे विष ! चैत्र पौर्णिमेला भरते यात्रा! अजूनही भगत ओढतात बारा गाड्या!
🙏 *ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज* 🙏
सोनांबे गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथाचे मंदिर हे प्राचीन व इतिहासकालीन मंदिर आहे. म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांचा विश्वासू सहकारी व राणे खानचा बंधू हिरे खान यांचे सोनांबे येथे पूर्वी वास्तव्य होते. त्यांची ऐतिहासिक हवेली आज तागायत येथे आहे. हिरे खान यांचे पुत्र यांना इंदोर येथे सर्पदंश झाल्यावर डोली करून सोनांबे येथे आणले असता तो बरा झाला .सिन्नरमधील देवपूर अन् राणेखानाच्या इतिहासाला पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. पानिपतच्या युद्धातून जखमी अवस्थेतेतील महादजी शिंदेंना राणेखानाने वाचविले व पुन्हा आपल्या मुलखात आणलं.
राणेखानाच्या निष्ठेवर खूश होत त्याला इमान म्हणून सिन्नर तालुक्यातल्या देवपूर, पिंपळवाडी, निमगांव, पास्ते ही गावे जहागिरी मिळाली. राणेखानाने देवनदीच्या किनारी प्रशस्त वाडा बांधला अन् येथेच विसावलाही. देवपूरमधील राणेखानाचा वाडा पाहताना त्यांच्या पराक्रमाची कल्पना येते. महादजी शिंदे राणेखानाला ‘भाई’ म्हणायचे अन् राणेखान गेल्यावर महादजी अनेक वेळा ‘भाई भाई’ म्हणून हाका मारायचे या संदर्भावरून राणेखानाचे व्यक्तित्त्व उलगडते. पण राणेखानाला हिरेखान नावाचा भाऊ असेल व देवपूरला राणेखान स्थिरस्थावर होत असताना त्याने आपल्या भावाला याच देवनदीच्या किनारी सिन्नरमधील सोनांबे या गावात वसवले असेल. हा इतिहास मात्र मौखिक रूपानेच सोनांबेकरांकडून ऐकायला मिळतो अन् त्या गावातील हिरेखानाच्या वाड्यासारख्या महालाच्या भिंती या इतिहासाचा साक्षीदार असल्याचे पहायला मिळतात. हिरेखान राणेखानासारखाच उमदा लढवय्या असणार, असा भास वाड्याच्या भिंतीला हात लावल्यावर होतो. दोघेही याच देवनदीच्या किनारी इतिहासाप्रमाणेच विसावले हेही दोघांमधील एक साम्य सोनांबे पुढे आणते .स्वतःच्या मुलाला येथे दर्शनासाठी आणले असता त्यांना जीवनदान मिळाले म्हणून हिरे खान यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. तेव्हापासून सर्पदंश झाला असता रोग्याला या मंदिरात आणून देवावर श्रद्धा ठेवून तीन दिवस ठेवले असता जीवनदान मिळते अशी येथील नागरिकांची भावना आहे. सर्पदंश झालेल्या अनेक व्यक्तींना जीवनदान मिळण्याच्या घटना घडल्याची प्रचिती येथील नागरिकांना आल्याने हे जागृत देवस्थान असल्याची भावना येथील ग्रामस्थांमध्ये आहे.
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून य मंदिराकडे पहिले जाते.आजही भैरवनाथ यात्रेत मंदिरासमोर मांडव टाकण्याचा मान मुस्लिम बांधवांना आहे .ही परंपरा आजगायत चालू आहे.लोकमान्य टिळकांनी या मंदिरास भेट देऊन मोठी निनाद घंटा अर्पण केली असल्याचे सांगितले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या जागृत मंदिरात रोज अनेक भक्त दर्शनासाठी येत असतात. मूर्ती, सुवर्ण व रेशीम असा वस्त्र पेहराव व सोन्याचा मुलामा असलेला मुकुट असे विलोभनीय दृश्य पाहून कुणीही भाविक नतमस्तक होतो. दानपेटीतून व चैत्र पौर्णिमेला होणाऱ्या यात्रोत्सवामधून निधी प्राप्त होत असतो. निधीमधून व लोक वर्गणी मधून मंदिराचा सभामंडप रंगकाम व सजावट केली जाते. समोर देवनदी व भोगनदी यांचा पवित्र संगम आहे. अनेक वर्षाचा प्राचीन वटवृक्ष भाविकांच्या छत्रछायेसाठी उभा आहे. मंदिराला देवनदीच्या रूपाने मिळालेली निसर्गाची देण आहे. मंदिराच्या बाजूलाच एक धर्मशाळा आहे. या मंदिराचे पुजारी जगन्नाथ आंबेकर, नामदेव आंबेकर व रमेश आंबेकर यांनी मनोभावे श्री भैरवनाथाची सेवा केली आहे. मंदिर परिसराची साफसफाई ठेवून या जागेचे पावित्र्य त्यांनी जोपासले आहे.
सालाबाद प्रमाणे चैत्र पौर्णिमेला श्री भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव उत्साहात संपन्न होतो. देव नदी व भोग नदीच्या संगमावरील या मंदिराची सजावट व रोषणाई हे भाविकांचे आकर्षण ठरते. सकाळी गंगा गोदावरीच्या पाण्याने भरलेल्या कावडीची मिरवणूक काढण्यात येते. गुलालाची उधळण करून पिपाण्या, तुताऱ्या व संबळ आधी वाद्यांच्या तालावर नाचणारे वयोवृद्ध आणि ढोल ताशाच्या नादावर थिरकणारी तरुणाई पावले असे विहंगम दृश्य असणारी ही मिरवणूक शिस्तबद्ध राहते. येथील ग्रामस्थ अनवाणी पायाने नाशिकमधून कावडीने गोदावरीचे पाणी आणतात. गंगाजलाने श्री भैरवनाथ महाराज मस्तकाभिषेक करण्यात येतो. सायंकाळी देवाच्या काठीची मिरवणूक काढण्यात येते. यावेळी समोरचा दीपस्तंभ दीपज्योतीने प्रज्वलित करण्यात येतो आणि हजारोच्या संख्येने बोकड बळी देण्यात येतात. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल होते. श्री भैरवनाथ महाराज ट्रस्ट, ग्रामपंचायत, यात्रा कमिटी व आयोजक यांच्याकडून मोठ्या स्वरूपात रोख रक्कम व ट्रॉफी स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात येते. आजवर श्री सोमनाथ डावरे, लक्ष्मण डावरे, समाधान डावरे व संदीप डगळे आदींनी अंतिम कुस्ती जिंकून गावाला परिसरात नावलौकिक मिळवून दिला आहे. कुस्त्यांचा फड संपल्यावर सायंकाळी रथासह बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. श्री खंडेरायांचे भगत श्री बबन बाबुराव पवार व श्री भैरवनाथाचे भगत श्री दशरथ भिमाजी पवार हे रथासह बारागाड्या ओढतात. या वेळी श्री भैरवनाथाचे पुजारी धोंडी आबा यांचे भक्त श्री निवृत्ती आंबेकर व राजाराम आंबेकर यांची उपस्थिती असते. नवसाला पावणाऱ्या या दैवताला अनेक भाविक लोटांगणे, दंडवत घालतात. दोन दिवसांच्या या यात्रोत्सवात लाखो भाविक दर्शनास येतात.
सोनांबे येथील ग्रामस्थांना दिवाळीप्रमाणे हा उत्सव देखील आनंददायी व प्रेरणादायी असतो. यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होते व स्थानिक लोकांना व इतर व्यावसायिकांना व्यवसायाच्या माध्यमातून नफा मिळतो. यात्रेत पूर्वी तमाशे यायचे मात्र काही कारणाने बंद झाले आहे. ग्रामपंचायत, श्री भैरवनाथ महाराज ट्रस्ट, यात्रा कमिटी, स्थानिक स्वराज्य संस्था व आयोजकाद्वारे पाणपोई, सजावट व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली जाते.
सोनांबे म्हणजे सोन्यासारख्या पिवळा धमक आंबा पूर्वी गावात पिकायचा. चार माणसांच्या घेराइतकी मोठाली आंब्याची झाडे गावात होती अन् त्यांना येणारे आंबे सोन्यासारखे झाडावर दिसायचे म्हणून गावाला सोनांबे असे नाव पडले, असेही सोनांबेकर सांगतात.
सोनांबेच्या नावाप्रमाणेच सोनांबेचा इतिहासही रंजक व गूढ आहे. मात्र तो आता हरवलेल्या अवस्थेत आहे. औरंगजेबाने नाशिक परिसरातील किल्ले घेण्यासाठी पाठविलेला एक सरदार सोनांबेतील भैरवनाथाचे मंदिर पाडण्यासाठी गावात आला होता. त्यावेळी त्या सुलतान नावाच्या सरदाराच्या भावाला सोनांबेत साप चावला. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला तीन दिवस भैरवनाथ मंदिरात बसवून ठेवले व त्याला झालेली विषबाधा दूर झाली. त्या सुलतानाने मंदिराला हात तर लावलाच नाही उलट मंदिराच्या जीर्णोद्धाराला मदत केली. भैरवनाथ मंदिरात साप चावलेल्या व्यक्तीला तीन दिवस बसवून ठेवल्यास विषबाधा होत नाही, अशी एक समजूतही ग्रामस्थांमध्ये आहे. गावात देवपूरच्या राणेखानाच्या भावाची म्हणजेच हिरेखानाची मोठी तीन मजली हवेली देवनदीच्या किनारी आहे.हवेलीला काही वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत ती पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र आजही हवेलीच्या तीन दिशांच्या बलाढ्या भिंती तग धरून उभ्या आहेत. या तीन मजली हवेलीचा दरवाजा अन् आतील लाकडी कोरीव काम अप्रतिम होते, असे तेथेच राहत असलेले हिरेखानाची वंशज पीरमहम्मद गुलाब पठाण व शाकिद पठाण सांगतात. मात्र आगीत सर्वकाही गेलं. हवेलीतील भुयार थेट देवपूरच्या राणेखानाच्या वाड्यात जाते, असेही ते सांगतात. मात्र आता तेथे कोणाला जावू दिले जात नाही. बिबी नावाची हिरेखानाची बहिण सोनांबे शेजारच्याच वडगाव सिन्नर या गावात दिली होती. बहिणीचे लग्न करताना हिरेखानाने भेट म्हणून सालखडी नदी दिली होती. त्यामुळे वडगाव सिन्नरची मंडळी हक्काने सालखडी नदीचे पाणी पाटाने त्यांच्या गावात नेतात, असेही ग्रामस्थ सांगतात. हिरेखानाबद्दल इतिहास फार काही सांगत नसला तरी हवेली वजा वाडा त्याची शैली खूप काही सांगून जाते..
हिरेखानाच्या वाड्याकडून भैरवनाथाच्या मंदिराकडे जाताना गावातील ब्रिटीशकालीन शाळा लागायची. आज ही शाळा इम्पथी फाऊंडेशन व ग्रामस्थ यांच्या सहयोगाने अत्याधुनिक इमारतीत बघायला मिळत आहे . उजव्या हाताला एक मंदिर व त्यासमोर एक पेशवेकालीन विहीर म्हणजे टाके आहे. बाजूलाच शनी महाराज मंदिर आहे.
भैरवनाथांचे मूळ गाभारा मंदिर दगडी बांधणीचे आहे. या मंदिरात छोटे दगडी देवघर आहे ते मूळ भैरवनाथ मंदिर म्हटले जाते. मंदिरावर द्वारपाल, माथ्यावर गणपतीची उभी मूर्ती, कळसाला वेढा घातलेला नाग अन् गणपती मूर्तीच्या दोन्ही बाजूने वाघांच्या प्रतिमा छोट्याखानी मंदिराला साज चढवितात. या दगडी मंदिराभवती मोठे मंदिर बांधले आहे. त्यावर कौले बसविण्यात आली आहेत. मंदिराच्या कामासाठी भगूर व घोटीकरांनी मदत केल्याचा उल्लेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे. मंदिरात लोखंडी दोन नगारे आहेत. मंदिराच्या समोरचा मंडप सिमेंटचा बांधलेला आहे. मंदिरासमोरील दीपमाळ खूपच सुंदर असून, दीपमाळेवर पायांपाशी उठावदार नागाची प्रतिमा कोरलेली आहे. मंडपात अनेक समाधी आहेत. भैरवनाथाच्या यात्रेची सुरूवात पहिल्या दिवशी पालखी, रथ परंपरेने होते. संध्याकाळी काठ्या मिरविल्या जातात.
दुसऱ्या दिवशी कुस्त्या संध्याकाळी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. बोहाडा ही परंपरा १५ वर्षांपासून बंद आहे. मात्र सोंगाचे मुखवटे दैवत म्हणून अनेकांनी जपले आहेत. गावात बाबुराव बाबा पवार यांची समाधीही आहे. त्यांचे वंशज बबन बाबुराव पवार यांच्याकडे बारागाड्या ओढण्याचा मान आहे. भैरवनाथ मंदिरामागे नागोबा काळेंची समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराज विश्रामगडावर असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नागोबा काळे यांच्याकडे होती. त्यांच्याकडे घोडा असल्याने त्यांना घोडे आडनाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यांना छत्रपतींनी सोनांबे गावात जहागिरी म्हणून जमीन दिली होती. घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. खापराळे गावातील डोंगरावरील भवानी देवीलाही ग्रामस्थ मानतात. गावातील काळे-घोडे मंडळी देवीची पूजा करतात. गावात काशीआई, हनुमान मंदिर, राम मंदिर, महादेव मंदिरासह इतरही अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. नाशिकरोडच्या अनुराधा थिएटरचे रामनाथ कलंत्री व इतर कलंत्री मंडळी या गावची.
भैरवनाथ मंदिराच्या डाव्या हाताला देवनदी व त्यावर ब्रिटीशकालीन बंधारा पहायला मिळतो. गावातून बाहेर पडताना हनुमान मंदिरातील वीरगळ अन् मंदिरामागील अहिल्याबाईंची बारव पहायला विसरू नका. आता आतापर्यंत बारवेचे पाणी ग्रामस्थ वापरत होते. मात्र त्यात खूप कचरा साचल्याने ती मृत अवस्थेत आहे. ही बारव स्वच्छ करून जपण्याची गरज आहे. बारवे शेजारीच गोसावींच्या समाधी आहेत. येथील पवार कुटुंबीयांचा संबंध थेट मध्यप्रदेशातील धार संस्थानाशी असल्याचे सांगितले जाते.पवार हे मूळचे धारचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आजही काही पवार घराणे धार येथील कुलदेवतेला नियमितपणे जात असतात.
( पूर्वीचे मंदिर)
( श्रींचे भगत बबन बाबा पवार व इतर भक्तगण )
( श्रींचा मानाचा रथ )
( कावड मिरवणूक )
( श्रींची मानाची देव काठी )
( नामदार माणिकराव कोकाटे साहेब श्रींच्या चरणी नतमस्तक)























टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा