*तत्वनिष्ठ राजकारणी - कै. सहकार महर्षी रामनाथ पांडुरंग डावरे*
आधी प्रपंच करावा नेटका l मग घ्यावे परमार्थ विवेका l या समर्थ रामदासांच्या उक्ती प्रमाणे सहकार महर्षी कै. रामनाथ पांडुरंग डावरे यांनी आपला प्रपंच सांभाळून समाजसेवा केली. कै. रामनाथ पांडुरंग डावरे यांचा जन्म देवनदी खोऱ्यातील सोनांबे गावात एका शेतकरी कुटुंबात झाला .वारकरी पार्श्वभूमी असलेल्या कै. रामनाथ डावरे यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करून गावातच ह .भ .प. टेलर्स नावाने टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला. शिवणकाम करीत असताना लोकांशी त्यांचा संपर्क येत गेला. अध्यात्मिक विचारसरणी असल्याने राम जन्मभूमी आंदोलनाशी त्यांचा संबंध आला.डूबेरे येथील कै. वामने गुरुजी, सोनारीचे कै. रामनाथ वाघसरे गुरुजी यांच्या संपर्कातून ते विश्व हिंदू परिषदेच्या कार्याकडे वळले. त्यातूनच आयोध्येतील राम जन्मभूमी आंदोलनात ते ओढले गेले .तेथील कार सेवेत सहभागी झाले. तिथेच त्यांची वैचारिक बैठक तयार झाली.पुढे त्यांनी याच विचारधारेशी ठाम असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे काम सोनांबे गावात सुरू केले. त्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस पक्षाची सत्ता होती. भाजपा पक्ष आजच्यासारखा सत्तेत नव्हता .पक्षाचे काम करणे म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखे होते. तरीही कै. रामनाथ डावरे यांनी निष्ठेने काम केले आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते पक्षातच कायम राहिले.निष्ठेची विश्ठा झालेल्या आजच्या काळात आयुष्यभर एकाच पक्षात राहणे तसे दुर्मिळच.
1995 साली राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्यावर त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारणाचा श्रीगणेशा केला व उपसरपंच पदापर्यंत मजल मारली. गावच्या सहकारी सोसायटीतही आपला पॅनल निवडून आणला .यानंतर त्यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अथवा राजकारणात कोणीही गॉडफादर नसताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला व गावातील ज्येष्ठांना सोबतीला घेऊन देव नदी खोरे पतसंस्थेची स्थापना केली. या पतसंस्थेला सिन्नर तालुक्याची जीवनदायीनी असलेल्या देव नदीचे नाव देऊन नदीचा व खोऱ्याचा खऱ्या अर्थाने गौरव करून मातीशी असलेली नाळ अधिक घट्ट केली .पुढे लोकशाही प्रक्रियेत या पतसंस्थेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ज्या संस्थेची स्थापना केली त्याच संस्थेतून त्यांना पायउतार व्हावे लागले. हा राजकीय पराभव त्यांच्या जिव्हारी लागला पण रामनाथ डावरे हार मानणारे नव्हते !विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली असे म्हणतात .त्याप्रमाणे त्यांनी नव्याने गोवर्धन पतसंस्थेची स्थापना केली.संस्थेला जागा नव्हती म्हणून बस थांब्यावरील शिवणकाम दुकानाशेजारील स्वामालकीच्या जागेत संस्था सुरू केली .पुन्हा एकदा त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली.पुनश्च हरिओम म्हणून नव्याने सुरुवात केली. श्रीकृष्णाने देवांचा राजा इंद्राने केलेली पर्जन्यवृष्टी रोखून धरण्यासाठी आपल्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला व संपूर्ण गोकुळाचे संरक्षण केले अशी आख्यायिका आहे .असाच काहीसा संदेश त्यांनी या पतसंस्थेला नाव देताना दिला .आव्हानाचा गोवर्धन त्यांनी लिलया पेलला. .गावात आधीच त्यांनी स्थापन केलेली देवनदी पतसंस्था व त्यात पुन्हा गोवर्धनच्या रूपाने दुसरी पतसंस्था, यामुळे तीव्र स्पर्धा तयार झाली. अशावेळी गोवर्धन पतसंस्थेचे अस्तित्व धोक्यात येते की काय अशी स्थिती निर्माण झाली. पण गावातीलच नवीन सहकारी जोडून व आपल्या जुन्या सहकाऱ्यांची मोट बांधून त्यांनी गोवर्धन पतसंस्था नावारूपाला आणली. गावातच पतसंस्थेची *स्वप्नपूर्ती* नावाची भव्य प्रशासकीय इमारत उभारली . सिन्नर शहरातही संस्थेची शाखा सुरू केली.आज गोवर्धन पतसंस्था रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.प्रतिष्ठेचा बँको ब्लू रिबन पुरस्कार पतसंस्थेला मिळाला आहे. 39 कोटींच्या गौरवशाली टप्प्यावर संस्था उभी आहे. 70 कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय संस्थेने केला आहे. सर्व ठेवीदार, सभासद ,हितचिंतक यांचे बहुमोल सहकार्य आणि अतूट विश्वास यांचे पाठबळ संस्थेला मिळाले आहे. एक विश्वसनीय आधार, खणखणीत नाणं.. विश्वासाच ! म्हणून संस्था काम करत आहे. सेवा, विश्वास, प्रगती या त्रिसूत्रीवर संस्थेचा कारभार चालू आहे. असे असताना संस्थापक चेअरमन रामनाथ डावरे हे सर्व पाहायला नसावेत हा मोठा दैवदुर्विलास आहे. कालाय तस्मैय नमः !दुसरे काय?
भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष ,विशेष कार्यकारी दंडाधिकारी, जनता विद्यालय शालेय समिती सदस्य, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष ,सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष, खरेदी विक्री संघ सदस्य, संजय गांधी निराधार योजना ,दक्षता समिती, शांतता समिती यावर सदस्य म्हणून त्यांनी काम केले. अशा वेळी त्यांचा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जा राज्यमंत्री कै. तुकाराम दिघोळे ,विद्यमान कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे ,खासदार राजाभाऊ वाजे, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी आरोग्य मंत्री कै. दौलतराव आहेर, जिल्हा परिषद अध्यक्ष कै. गोपाळराव गुळवे,माजी खासदार कै.प्रतापदादा सोनवणे ,जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सुरेशनाना निकम,ज्येष्ठ नेते ऍड भगीरथ शिंदे,निवृत्तीमामा डावरे,कृष्णाजी भगत,एन एम आव्हाड,शंकर नाना पवार,काशिनाथ पाटील पवार,एकनाथ दादा पवार,सोपान काका पवार,दादा पाटील वारुंगसे, डॉ राजेंद्र गोऱ्हे,बी एम पवार सर,नारायण सेठ वाजे,सुनील हांडे सर,भाऊसाहेब शिंदे,बापू पंडित आदींशी निकटचा संबंध आला. या सर्व मान्यवरांच्या संपर्कातून गावाची व तालुक्याची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. वारकरी विचारसरणीचे पाईक, मृदू व शांत स्वभाव ,प्रखर तत्वनिश्ठा यामुळे त्यांनी खूप मित्र मिळवले. या सर्व संघर्षमय प्रवासात विद्यमान चेअरमन शरद रत्नाकर सर,पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार,सोसायटी चेअरमन तानाजी पवार, दत्तात्रय पवार सर,भाऊसाहेब पवार,अनिल अण्णा पवार,सलीम शेख,दीपक वारुंगसे,संतोष डावरे,संगीता बोडके,ताराबाई पवार,दशरथ पवार,दत्तू घोडे,संदीप घोडे,देवराम डगळे,शंकर आव्हाड,संजय बोडके,कै.अरुण पवार या सर्व सहकारी मित्रांची मोलाची साथ त्यांना मिळाली .
शेवटच्या क्षणापर्यंत ते गळ्यात टेलरचा टेप व कानात पेन अडकवून मशीनवर बसून कपडे शिवत असलेले दिसायचे .आजच्या काळातील हे दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल. असे असताना साहजिकच त्यांचे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले. निष्ठावान राजकारण करीत असताना त्यांना कोणतेही लाभाचे पद मिळू शकले नाही. ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली असतानाही आपण पंचायत समिती जिल्हा परिषद या ठिकाणी जाऊ शकलो नाही याची खंत त्यांना वाटायची. आपले शिक्षण कमी असल्याने आपण राजकारणात मागे पडू नये म्हणून की काय पदविधर व्हायचा ध्यास त्यांनी घेतला.तत्कालीन प्राचार्य शरद रत्नाकर यांच्या मार्गदर्शनाखाली याही वयात त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवली. त्यावेळी त्यांना झालेला आनंद अवर्णनीय होता. यातून त्यांची शिक्षणाविषयीची जिद्द व आस्था दिसून येते. त्यांनी जन्मभर ज्या पक्षात काम केले तो पक्ष देशात सर्वत्र सत्तास्थानी दिसू लागला होता. आता कुठे लावलेल्या वृक्षाला फळे येणार होती, राजकारणातील प्रतीक्षा संपणार होती, कुठेतरी त्यांना सत्तेचा सोपान चढायची संधी मिळणार होती ....अशा काळातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांचे जाण्याचे वय नव्हते पण ते गेले मात्र आज सोनांबे गावचे सहकार महर्षी म्हणून ते अजरामर झाले.कार्यकर्ते घडविणारे विद्यापीठ म्हणून त्यांच्याकडे बघावे लागेल.आज त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांच्या माध्यमातून अनेकांचा राजकीय उदय झाला.अनेक कार्यकर्ते घडले.अनेक व्यावसायिक व उद्योजक निर्माण झाले. याचे श्रेय डावरे साहेबांना द्यावे लागेल .सत्य सांगा लोका ,जरी कडू लागे या तुकोबांच्या उपदेशाने त्यांनी काम केले.मरावे परी कीर्ती रूपे उरावे म्हणतात हेच खरे!
स्वातंत्र्यासाठी या आम्ही काय केले l
पूर्वज श्रमले तयासाठीl
वृक्ष लावणारे निघूनीया जातीl
तळी विसावती सानथोर l
असे एका कवीने म्हटले आहे ते या ठिकाणी तंतोतंत लागू पडते.सहकार महर्षी कै. रामनाथ डावरे यांची स्मृती व कार्य या संस्थांच्या माध्यमातून चिरंतन राहील व येणाऱ्या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील यात काही शंकाच नाही. सहकार महर्षी कै.रामनाथ डावरे यांना प्रथम स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !!





विनम्र अभिवादन!!💐
उत्तर द्याहटवाMiss you साहेब
उत्तर द्याहटवा