हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविणारी सोनांबेची भैरवनाथ यात्रा !!

 हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविणारी सोनांबेची भैरवनाथ यात्रा !!

सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सर्वात मोठी यात्रा असा नाव लौकीक असणारी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक बनलेली आहे.

येथील मुस्लिम कुटुंबीयांना देवाचा मांडव टाकण्याचा मान गेल्या कित्येक वर्षापासून असून मुस्लिम बांधव ही परंपरा मोठ्या उत्साहाने पार पाडतात. यावर्षीही नाशिक येथून पवित्र गोदावरीचे पाणी अनवाणी पायाने चालत कावडी धारकांनी आणले.या पवित्र कावडींची मिरवणूक सकाळी गावातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघाली. तत्पूर्वी राजू पठाण,युनूस पठाण,अरबाज पठाण,इब्राहिम शेख,निसार पठाण या मुस्लिम बांधवांनी  निंब व आंबा या वृक्षांच्या डहाळ्या वाजत गाजत आपल्या बैल गाडीतून नेवून श्री भैरवनाथ महाराज यांचा मंडप सजवला .त्या नंतरच पवित्र कावड मिरवणूक काढण्यात आली.

        मुस्लिम बांधव राम नवमीला श्रीराम मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहात संत भोजन व पंगत देतात.गावातील हिंदू बांधव रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करतात.हे या गावचे वैशिष्ट सांगता येईल.

     अनवाणी पायाने आलेल्या या कावडी धारकांचे सरपंच जनार्दन पवार,राजू पठाण,ग्राम पंचायत सदस्य शरद डगळे यांनी पाद प्रक्षालन केले. सोनांबे गावातील चाकरमाने,माहेर वाशिणी तसेच पाव्हणे रावळे यात्रेला आवर्जून हजर असतात. सकाळच्या कावडी मिरवणुकीत सर्वांनी भाग घेतला व या पवित्र जलाने श्रींच्या मूर्तीचा अभिषेक केला.कावडी धारकांचे नृत्य व आनंद बघण्यासारखा होता.गावातील शुर विर माजी सैनिक संघटनेच्या वतीने कावडी मिरवणुकीतील अबाल वृद्धांना थंडगार मठ्ठा देण्यात आला.गावातील विकासात आपलाही वाटा असावा म्हणून यात्रेला गावी येणारे हे आजी माजी सैनिक दरवर्षी हा उपक्रम राबवतात.गावात वृक्ष प्रेमी मंडळाने गाव व परिसरात ४०० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत दररोज सकाळी वृक्षप्रेमी तास दोन तास श्रमदान करतात.उन्हाळ्यात पाण्या अभावी झाडे मरु नयेत म्हणून काळजी घेतात .या झाडांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून आजी माजी सैनिक संघटनेने रू ५००१ देणगी वृक्षप्रेमि मंडळाकडे सुपूर्द केली.गावातील हनुमान मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे .तिथेही आजी माजी सैनिकांनी रू ११००० ची देणगी दिली आहे .उन्हाळ्याच्या दिवसात येणाऱ्या या यात्रेत भाविकांची तहान भागावी म्हणून आई भवानी माता महिला पतसंस्थेने पाणपोई उभारली आहे.यात्रेत उत्साह जाणवत असून यात्रा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी,भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट,ग्राम पंचायत व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.


( मुस्लिम बांधवांची मांडव डहाळे मिरवणूक )


( भाविक व कावडी धारकांना थंडगार मठ्ठा वाटप करतांना शुर वीर आजी माजी सैनिक संघटना.)


( सरपंच जनार्दन पवार कावड मिरवताना)


 ( राजू पठाण व सरपंच जनार्दन पवार कावडी धारकांचे पाद प्रक्षाळण करतांना )


( हनुमान मंदिर जीर्णोद्धार साठी रू ११००० देणगी देताना शुर वीर आजी माजी सैनिक संघटना)

टिप्पण्या